भविष्य
नोव्हेंबर 23, 2011 यावर आपले मत नोंदवा
ह्यापूर्वी – भाग १- चंद्र नसता तर..
भाग २- मिलॅंकोविच सिद्धांत
भाग ३- ऊर्जा संकल्प आणि पृथ्वीप्रकाश
भाग ४- भरती-ओहोटी आणि इतर चांद्रगोष्टी
चंद्राचे महत्त्व
भाग ५ – भविष्य
भविष्यात होणार्या हवामान बदलाचा विचार करताना आपण केवळ आणखी काहीशे वर्षांपर्यंतच्या हवामानाबद्दल बोलतो. एकतर खूप पुढचा हवामानअंदाज वर्तविणे अवघड, आणि जरी वर्तवलाच तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मात्र काहीशे वर्षांमध्ये हवामानात होणार्या बदलाची मुळे सध्याच्या हवामानात, हवामानाच्या नैसर्गिक चक्रामध्ये तर असतीलच, पण शिवाय ती असतील मानवानिर्मित गोष्टींमधे. ह्या काहीशे वर्षामधे चंद्र-पृथ्वीच्या परस्पर संबंधामधे लक्षणीय फरक पडणार नाही. त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने होऊ शकणार्या हवामानीय परिणामांची आपल्याला काळजी करण्याची मुळीच गरज नाही. मात्र गरज नसली तरीही कुतुहल शमविण्यासाठी दूर भविष्यकाळाचा थोडा वेध घेऊ.
पृथ्वीसापेक्ष सूर्य आणि चंद्राची स्थिती बदलल्याने भरती-ओहोटीच्या जोरावर होणार्या परिणामाबद्दल आपण आधीच्या भागात वाचले. मात्र, तेव्हा आपण केवळ समुद्राच्या पाण्याला येणार्या भरती-ओहोटीचाच विचार केला. समुद्राची भरती-ओहोटी सहजदृश्य आणि मोठ्याप्रमाणात असते. चंद्राकर्षणाने वातावरणाला आणि जमिनीला येणारी भरती-ओहोटी मात्र अगदीच अल्प आणि जाणवण्याएवढी नसली तरी ती अस्तित्वात असते हे खरेच.
वातावरण हा एक वहनशील पदार्थ (fluid) असल्याने चंद्राकर्षणाने ते चंद्राच्या दिशेने खेचले जाते. त्यामुळे वातावरणामध्ये जमिनीपासून आकाशाच्या दिशेने लहरी निर्माण होतात. अशा लहरी भूपृष्ठालगतची हवा तापल्यामुळेही वातावरणामध्ये निर्माण होतात आणि ह्या लहरींची वारंवारिता (frequency) आणि परिमाण (magnitude) हे वातावरणीय भरती-ओहोटीमुळे निर्माण होणार्या लहरींच्या तुलनेत खूपच मोठे असते.
चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे त्याची पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थिती सतत बदलत रहाते. चंद्राकर्षण व सूर्याकर्षण अशी दोन भिन्न बले भिन्न दिशांनी (torque) पृथ्वीवर कार्य करतात. ह्या बलांमुळे, समुद्राला येणार्या भरती-ओहोटीच्या लाटांमुळे आणि पृथ्वीभोवतीच्या वहनशील वातावरणामुळे निर्माण होणार्या घर्षणाचा (tidal breaking) परिणाम होऊन पृथ्वीचा वेग मंदावत आहे. वेग मंदावण्याचा दर शतकाला १.५ ते २ मिलिसेकंद असा फारच मंद आहे. संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार (conservation of momentum) पृथ्वी व चंद्र मिळून तयार होणार्या संयुक्त संस्थेचा कोनीय संवेग (angular momentum) कायम रहावा म्हणून पृथ्वीचा वेग मंदावल्याने होणारा संवेगबदल हा चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेच्या त्रिज्येत वाढ होऊन भरून काढला जातो. म्हणजे पृथ्वीचा वेग जसजसा मंदावेल तसतसा चंद्र पृथ्वीपासून अधिकाधिक दूर जाईल. चंद्राच्या कक्षेची त्रिज्या दरवर्षी ३ सेंटीमीटरने वाढत आहे.
चंद्र पृथ्वीपासून दूर जात असला तरी तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकणार नाही आणि पृथ्वीला सोडून जाणार नाही. सध्या चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग सारखाच आहे. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची कायम एकच बाजू दिसते. मात्र चंद्राच्या पृथ्वीच्या दिशेने तोंड असलेल्या भागावरून पृथ्वीच्या सर्व बाजू दिसतात. पृथ्वीचा वेग मंदावत जाऊन आणि चंद्राच्या कक्षेची त्रिज्या वाढत जाऊन एक स्थिती (tidal locking, synchronous orbit) अशी येईल की त्यावेळी पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू तर दिसेलच, पण चंद्रावरूनही पृथ्वीची एकच बाजू सतत दिसेल. ह्याचा अर्थ पृथ्वीच्या अर्ध्या भागाला सतत चंद्रदर्शन घडेल तर अर्ध्या भागाला कधीच चंद्रदर्शन घडणार नाही. म्हणजेच चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सारखाच असेल. त्यावेळी पृथ्वीवरचा महिना ५० दिवसांचा असेल आणि चंद्राच्या कक्षेची त्रिज्या ५० टक्यांनी वाढलेली असेल. त्यावेळच्या हवामानाची कल्पना करणे केवळ अशक्य.
ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी अब्जावधी वर्षांचा कालावधी जावा लागेल आणि म्हणूनच आज आपल्याला त्यावेळच्या पृथ्वीय हवामानाची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र चंद्रावरची पृथ्वीय हवामानातील दीर्घकालीन बदलांची जबाबदारी कायम राहील.
समाप्त.
वरदा व. वैद्य, एप्रिल २००५ । Varada V. Vaidya, April 2005