मनस्वी प्रशांत – एल निन्यो व ला निन्या
ऑक्टोबर 21, 2009 १ प्रतिक्रिया
मनस्वी प्रशांत
पूर्वप्रकाशन : मनोगत दिवाळी अंक २००९.
‘पृथ्वी गोल आहे. तर, युरोपातून भारत आणि पूर्व आशियाला जाण्यासाठी आफ्रिकेला वळसा घालून जाण्यापेक्षा समुद्रमार्गे पश्चिमेकडे गेल्यास जवळचा मार्ग सापडू शकेल’ अशा विचाराने मोहिमेवर निघालेल्या फर्नान्डो मॅजेलानला (मूळ पोर्तुगीज, मात्र स्पेनच्या झेंड्याशी निष्ठा राखणारा) दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जावे लागले. दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका खंडादरम्यानच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून (जी आता मॅजेलानची सामुद्रधुनी (Strait of Magellan) म्हणून ओळखली जाते) पुढे गेल्यानंतर त्याला शांत आणि अथांग असा आणखी एक समुद्र लागला. त्या शांत पाण्याला उद्देशून त्याने ह्या महासागराचे नामकरण पॅसिफिक, अर्थात प्रशांत असे केले. ह्याचे नाव जरी प्रशांत ठेवले, तरी तो सर्वत्र आणि नेहमी, वाटतो तेवढा शांत नसतो. विशेषत: विषुववृत्तीय प्रदेशात ह्याचा स्वभाव कशाने बदलेल हे सांगणे कठिण असते. प्रशांत महासागराचा “पारा चढला” की त्याला म्हणतात “एल निन्यो” (El Niño) आणि त्याने “थंडा प्रतिसाद” दिला की त्याला म्हणतात “ला निन्या” (La Niña). एकूण प्रशांत महासागराचा हा मनस्वी स्वभाव जागतिक हवामानात मोठी ढवळाढवळ करतो.
एल निन्योचा इतिहास
इ. स. १५०० च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनार्यावर लहान बोटींतून मासेमारी करणार्या कोळ्यांना प्रशांत महासागराचा पारा अधूनमधून चढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. पेरूच्या किनार्याजवळ दर काही (सुमारे ४ ते ७) वर्षांनी समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त तापलेले असते असा अनुभव त्यांना वारंवार येत असे. पाण्याचे तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळच्या सुमारास घडत असल्यामुळे त्यांनी ह्या घटनेचे नामकरण एल निन्यो, अर्थात बालयेशू (Christ child) किंवा छोटा मुलगा असे केले. इ.स. १७०० ते १९०० च्या दरम्यान अनेक युरोपीय खलाशांनी ह्या तापमानवाढीच्या नोंदी लिहून ठेवल्या. ह्या नोंदी पुढे एल निन्यो आणि त्याच्या परिणामांच्या संशोधनांमध्ये उपयुक्त ठरल्या. १८९१ मध्ये पेरू देशातील डॉ. लुइस करॅंझा ह्या भूगोलतज्ज्ञाने दक्षिण अमेरिकेच्या पाऊसपाण्यामध्ये आणि हवामानामध्ये होणारे विचित्र बदल हे एल निन्योमुळे होतात असे सांगणारे त्याचे संशोधन प्रसिद्ध केले.
सर गिल्बर्ट वॉकर (१८६८ ते १९५८) हे ब्रिटिश गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ. १९२३ मध्ये त्यांनी विषुववृत्तीय (equatorial) प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील प्रदेशातील वातावरणी दाबामध्ये परस्परसंबंध असल्याचे सिद्ध केले. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्वप्रदेशातील वातावरणी दाब अधिक असेल तर पश्चिमप्रदेशात तो सहसा कमी असतो आणि पूर्वप्रदेशात वातावरणी दाब कमी असेल तर पश्चिमप्रदेशात तो अधिक असतो. अशा प्रकारे पूर्व-पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये वातावरणी दाबाचा ‘सीसॉ’ चालू असतो. ह्या ‘सीसॉ’ला त्यांनी ‘दक्षिण आंदोलन’ (Southern Oscillations) असे नाव दिले. जेकब जर्कनेज (१८९७ ते १९७५) ह्यांना विषुववृत्तीय प्रशांत महासागर आणि त्याच्या पूर्व व पश्चिमेकडील प्रदेश मिळून तयार होणार्या मोठ्या प्रदेशावर एक मोठे वातावरणी अभिसरणचक्र कार्यरत असल्याचे आढळून आले. ह्या अभिसरणचक्राचा ‘दक्षिण आंदोलनां’शी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांनी ह्या अभिसरणास ‘वॉकर अभिसरण’ (Walker Circulation) असे नाव दिले (आकृती १ पाहा). विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठीय तापमानाचा (Sea Surface Temperature, SST) ह्या दक्षिण आंदोलनांशी संबंध असल्याचे वॉकर यांच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले.
आकृती १. (द्विमित) वॉकर अभिसरण. NOAAच्या GFDL संकेतपानावरून साभार व सुधारित.
त्यावरून एल निन्यो आणि दक्षिण आंदोलने मिळून एन्सो (ENSO – El Nino Southern Oscillations) ही संज्ञा अस्तित्वात आली. १९०४ ते १९२४ च्या दरम्यान वॉकर हे भारतीय हवामान खात्याचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होते. भारतातील मौसमी पाऊस, पश्चिम कॅनडातील तापमान आणि ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेतील दुष्काळ अशा विविध घटनांचा संबंध दक्षिण आंदोलनाशी असल्याचे त्यांनी ह्या संशोधनांती दाखवून दिले. जेकब जर्कनेझ ह्यांनी एन्सोचे कार्य कसे चालते त्याचे सविस्तर स्पष्टीकरण केले. वॉकर अभिसरणाची तीव्रता ही विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठीय तापमानातील बदलांनुसार नियंत्रित होते. अशाप्रकारे समुद्र आणि हवेमध्ये उष्णता, ऊर्जा, बाष्प आणि संवेगाची (momentum) देवाणघेवाण होते. समुद्रपृष्ठाच्या तापमानातील बदल पृष्ठीय हवेच्या दाबातील बदलामध्ये परावर्तित होतात.
दक्षिण आंदोलनांची तीव्रता दर्शविणारा स्थिरांक (Southern Oscillations index SOI) काढण्यासाठी विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्वभागातील ताहिती बेट (१७.५o दक्षिण, १४९.६o पश्चिम) आणि पश्चिमेला ऑस्ट्रेलियातील डार्विन हे शहर (१२.४ o दक्षिण, १३०.९o पूर्व) ह्या दोन ठिकाणांवरील हवेच्या दाबाचा वापर केला जातो. जेव्हा SOI मोठा आणि धन (positive) असतो तेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वभागावरील पृष्ठीय दाब फारच जास्त असतो, तर हा स्थिरांक लहान आणि ऋण (negative) असतो तेव्हा पश्चिमभागावरील पृष्ठीय दाब फार जास्त असतो. आत्यंतिक मोठा आणि ऋण SOI एल निन्यो आणि धन SOI ला निन्या घटनांकडे निर्देश करतो (आकृती २ पाहा).
आकृती २. दक्षिण आंदोलने स्थिरांक. जॉन डाली यांच्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व भागाचे तापमान सामान्यत: असणार्या तापमानापेक्षा वाढण्याच्या घटनेला एल निन्यो म्हणतात, तर त्याउलट ह्या भागाचे तापमान सामान्यत: असणार्या तापमानापेक्षा कमी होण्याच्या घटनेला ला निन्या म्हणतात. ला निन्या ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ “छोटी मुलगी” असा होतो. एल निन्यो आणि ला निन्या घटनांना एकत्रितपणे –एन्सो घटना– असे म्हटले जाते. मागील काळामध्ये महत्त्वाच्या एन्सो घटना १७९०-९३, १८२८, १८७६-७८, १८९१, १९२५-२६, १९७२-७३, १९७६, १९८२-८३ मध्ये तर नजिकच्या काळामधील एन्सो घटना १९८६-८७, १९९१-९४, १९९७-९८, २००२-२००३, २००४-२००५, २००६-२००७ साली घडल्या. नजिकच्या काळामध्ये ह्या घटना वारंवार घडत आहेत असे दिसून येते. १९८२-८३ आणि १९९७-९८ चे एल निन्यो ह्या आजवरच्या सर्वाधिक तीव्रतेच्या एल निन्यो घटना आहेत.
विषुववृत्तीय महासागराची सामान्य परिस्थिती
एल निन्यो व ला निन्या परिस्थिती असताना प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये नेमके कोणकोणते बदल घडून येतात हे पाहण्याआधी ह्या भागात परिस्थिती सामान्यत: कशी असते ते पाहू. (आकृती ३ व ४ पाहा.)
आकृती ३. प्रशांत महासागराचे तापमान सामान्य असतानाची परिस्थिती (normal condition). NOAA च्या GFDL संकेतपानावरून साभार व सुधारित.
आकृती ४. प्रशांत महासागराचे तापमान सामान्य असतानाची परिस्थिती (normal condition). वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्रा. केस्लर यांच्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
सामान्यत: विषुववृत्तीय प्रशांत महासागरापाशी पृष्ठीय व्यापारी वार्यांची (surface trade winds) दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी असते (आकृती ३ मधील “आ” व आकृती ४ पाहा). ह्या वार्यांच्या जोराने पृष्ठालगतचे गरम पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि त्याबरोबर गरम पाण्यामुळे तापलेली आणि दमट झालेली पृष्ठीय हवाही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहून नेली जाते. पश्चिमेकडे स्थानांतरित झालेल्या पृष्ठीय पाण्याची जागा समुद्राच्या खालच्या थरांतील थंड पाणी घेते (आकृती ३ मधील “उ”). अशा प्रकारे ही उदंचन क्रिया (upwelling, पाणी वरच्या दिशेने शेंदले जाण्याची क्रिया) खालच्या थरांतील खनिजे व क्षारांनी युक्त असे सकस पाणी वर आणते आणि त्यावर विविध परिसंस्था (ecosystems) पुष्ट होतात. ह्या भागामध्ये मासे व इतर सागरी जीवांची (प्राणी व वनस्पती) उपलब्धता भरपूर असल्यामुळे पेरू आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील इतर देशांमध्ये मासेमारी हा मोठा उद्योग आहे. जिथे उदंचन होते तिथे समुद्राचे पृष्ठीय पाणी जास्त थंड असते.
समुद्राच्या पृष्ठापासून खाली काही अंतरापर्यंतच्या पाण्याच्या थरामधले पाणी सतत ढवळले जात असते. ह्या थराच्या खालच्या थरांतील पाणी थंड असते आणि पाण्याचा थंडपणा खोलीनुसार वाढत जातो. जिथे पाण्याच्या तापमानात हा बदल होतो त्या प्रदेशास तापबदल प्रदेश (thermocline) असे म्हणतात. जिथे उदंचन होत असते तिथे तापबदल प्रदेश उथळ असतो. पूर्व प्रशांत महासागरापाशी तापबदल प्रदेश अशा प्रकारे उथळ (सुमारे ४० मीटर खोलीवर) असतो तर पश्चिम प्रदेशात तो खोल (सुमारे १०० ते २०० मीटर खोलीवर) असतो. अशा प्रकारे तापबदल प्रदेशाला पूर्वेकडे चढ (वा पश्चिमेकडे उतार) असतो (आकृती ४ पाहा). पृष्ठीय व्यापारी वार्यांमुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहून गेलेले पाणी पश्चिमेकडे साठते आणि त्यामुळे समुद्रपृष्ठाला पूर्वेकडे उतार असतो. ह्या चढ वा उताराची तीव्रता पृष्ठीय व्यापारी वार्यांच्या जोरावर अवलंबून असते. पेरू देशाच्या आसपासच्या प्रदेशापेक्षा इंडोनेशीय प्रदेशामध्ये समुद्राची पातळी सुमारे अर्धा मीटर जास्त असते. हवेतील अभिसरण समुद्री पाण्याच्या अभिसरणाच्या विरुद्ध दिशेने असते. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे साठलेले गरम पृष्ठीय पाणी तिथे पृष्ठालगतची हवाही तापवते. ह्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठालगतची उष्ण आणि दमट हवा वरच्या दिशेने प्रवाहित होऊन पृष्ठालगत कमी दाबाचा प्रदेश तयार होतो. ही उष्ण व दमट हवा वर गेल्यावर थंड होऊन त्यातून ढगांची निर्मिती होते आणि त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडतो. हवेच्या वरच्या थरांमध्ये वार्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. पाऊस पडल्यावर कोरडी झालेली हवा पूर्वेकडे वाहते आणि जसजशी थंड होईल तसतशी खाली उतरते. अशा प्रकारे विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व भागात जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
एल निन्यो परिस्थिती
विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील पाणी नेहमीच्या तुलनेत जास्त तापले की त्याला एल निन्यो म्हणतात. एल निन्योमुळे आपण वर पाहिलेल्या सामान्य परिस्थितीमध्ये कसा बदल होतो ते पाहू. पूर्वेकडील पाण्याचे तापमान वाढल्याने पृष्ठीय हवा तापून वरच्या दिशेने जाऊ लागते. ही हवा (वॉकर अभिसरणातील) वरून खाली येणार्या वार्यांना विरोध करत असल्यामुळे पृष्ठीय व्यापारी वार्यांचा जोर कमी होतो. त्यामुळे पूर्व भागातील गरम पाणी कमी वेगाने आणि कमी प्रमाणात पश्चिमेकडे वाहून नेले जाते. पूर्वभागातील उदंचन मंदावून सकस पाण्याचा पुरवठाही कमी होतो. परिणामी मत्स्योत्पादन घटते व संबंधित व्यवसायांना त्याचा फटका बसतो. व्यापारी वार्यांचा जोर जसजसा ओसरत जातो तसतशी पूर्वभागात अवांचनाला (downwelling, पाणी खालच्या दिशेने जाणे) सुरुवात होते. एल निन्यो काळात तापबदल रेषेचा उतार कमी होतो, तसेच समुद्र पृष्ठाचा पूर्वेकडील उतार नष्ट झाल्याने गरम पाणी मागे फिरून पूर्वेकडे येते (आकृती ५ पाहा).
आकृती ५. एल निन्यो काळातील परिस्थिती. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्रा. केस्लर यांच्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
जसा समुद्रपातळीचा उतार कमी होऊन गरम पाणी विषुववृत्तीय सागरी प्रदेशात पूर्वेच्या दिशेने पसरते तसे ढग आणि पावसाचे प्रदेशही पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतात. परिणामी सागरी पावसाचे प्रमाण वाढते. पश्चिम भागातील इंडोनेशीय, ऑस्ट्रेलीय आणि आसपासच्या भूमी प्रदेशातील पावसाचे प्रमाण घटून तिथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तर, पेरू, इक्वाडोर आणि आसपासच्या भागात पावसाचे प्रमाण वाढून पूरपरिस्थिती निर्माण होते.
ला निन्या परिस्थिती
विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील पाणी नेहमीच्या तुलनेत थंड असले की तिला ला निन्या म्हणतात. ला निन्यामुळे आपण आधी पाहिलेल्या सामान्य परिस्थितीमध्ये कसा बदल होतो ते पाहू. पश्चिमेकडील पाण्याचे तापमान कमी झाल्याने पृष्ठीय हवाही थंड होऊन तेथील हवेचा दाब वाढतो. हा दाब (वॉकर अभिसरणातील) वरून खाली येणार्या वार्यांना जोर पुरवतो आणि त्यामुळे विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्वेकडील पृष्ठीय व्यापारी वार्यांचा जोर वाढतो. त्यामुळे पूर्व भागातील पाणी जास्त वेगाने आणि जास्त प्रमाणात पश्चिमेकडे वाहून नेले जाते. पूर्वभागातील उदंचन वाढून खालच्या थरांतील थंड पाणी अधिकाधिक प्रमाणात वर येते. सकस पाण्याचा पुरवठा वाढतो. तेथील परिसंस्थांसाठी मोठ्या प्रमाणात खनिजे व क्षार उपलब्ध होऊन मत्स्योत्पादन, व इतर सागरी जीवांची संख्या वाढते व संबंधित व्यवसायांची भरभराट होते. ला निन्या काळात तापबदल रेषेचा उतार अधिक तीव्र होतो (आकृती ६ पाहा). तसेच समुद्र पृष्ठाचा पूर्वेकडील उतारही तीव्र होतो. जसजसा व्यापारी वार्यांचा जोर वाढतो तसतसे पूर्वेकडील थंड पाणी पश्चिमेकडे पसरत जाते.
आकृती ६. ला निन्या काळातील परिस्थिती. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्रा. केस्लर यांच्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
जोरदार व्यापारी वार्यांनी पश्चिमेकडे वाहून नेलेल्या पाण्यामुळे पश्चिमेकडील भागामध्ये उष्ण आणि दमट हवेला घेऊन वर जाणार्या वार्यांचा वेगही वाढतो. त्याने मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होऊन पश्चिम समुद्रात तसेच इंडोनेशीय प्रदेश, ऑस्ट्रेलिया व आसपासच्या प्रदेशांत पावसाचे प्रमाण आणि जोर वाढतो. तिथे मुसळधार पाऊस पडतो, पूर येतात, ओला दुष्काळ येऊ शकतो. हवेच्या वरच्या थरातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार्या वार्यांचा जोर वाढून मोठ्या प्रमाणात थंड आणि कोरडी हवा सागराच्या पूर्वभागात तसेच दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात खाली उतरते. त्यामुळे इक्वेडोर, पेरू व आसपासच्या देशांमध्ये ह्यावेळी पावसाचे प्रमाण खूपच कमी होऊन दुष्काळी परिस्थिती ओढवते.
एल निन्यो आणि ला निन्यामुळे निर्माण होणारी समुद्री आणि वातावरणी परिस्थिती एकमेकांच्या विरुद्ध असली तरी तीव्रतेच्या बाबतीत एल निन्योच्या तुलनेत ला निन्या सहसा सौम्य (mild) असते. म्हणजे एल निन्यो परिस्थितीमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पश्चिम भागातील तापमान जेवढ्या प्रमाणात वाढते त्यामानाने ला निन्या परिस्थितीत ह्या भागातले तापमान तेवढ्या प्रमाणात कमी होत नाही. एल निन्यो परिस्थिती सुमारे ४ ते ७ वर्षांनी येते. सहसा (पण नेहमीच नव्हे) एल निन्यो नंतरच्या वर्षामध्ये ला निन्या परिस्थिती येते. म्हणजेच ला निन्या एल निन्योला अनुसरते.
जागतिक परिणाम
पृथ्वीवर स्थानिक, प्रांतिक आणि जागतिक श्रेणींची (scales) अनेक अभिसरण चक्रे एकाच वेळी कार्यरत असतात. त्यापैकी प्रमुख अभिसरण चक्रे आणि मानवाच्या अभिसरणाच्या आकलनामध्ये काळानुरूप होत गेलेल्या प्रगतीचा आढावा मनोगतावरील ‘वातावरणीय अभिसरण भाग १ ते ७‘ ह्या लेखमालेमध्ये वाचता येईल. ही अभिसरण चक्रे एकमेकांमध्ये गुंतलेली असून एका चक्रात झालेला बदल कमी जास्त प्रमाणात इतर चक्रांमध्ये परावर्तित होतो. वातावरण ह्या बदलांशी जुळवून घेते ते इतर चक्रांमध्ये बदल करून. काही चक्रांमध्ये एन्सोपाठोपाठ लगेच बदल घडतो तर काही चक्रांमध्ये बदल घडण्यासाठी मध्ये काही काळ लोटावा लागतो (time lag). एन्सो घटनांमुळे वॉकर अभिसरण चक्राच्या तीव्रतेमध्ये बदल होत असल्याने पावसाचे प्रदेश त्यांच्या मूळ ठिकाणांपासून इतरत्र सरकतात. पृष्ठीय हवेच्या दाबाचे पट्टेही जागा बदलतात. पृष्ठीय तापामानामध्ये बदल होतो. त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होऊन काही प्रदेशांना जास्त प्रमाणात पाऊस मिळतो तर काहींना अवर्षणास तोंड द्यावे लागते, काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ होते तर काही ठिकाणी घट होते, काही ठिकाणी हवा कोरडी होते तर काही ठिकाणी दमट. आकृती ७ व ८ मध्ये अनुक्रमे एल निन्यो आणि ला निन्या परिस्थितींमुळे जागतिक हवामानात उन्हाळी व हिवाळी महिन्यांमध्ये कसे बदल होतात ते दर्शविले आहे. एन्सो घटनांचा परिणाम अर्थातच विषुववृत्तानजिकच्या प्रदेशात सर्वाधिक असतो. एल निन्योमुळे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढते, पेरूमध्ये पूर येतात, दक्षिण अमेरिकेच्या वाळवंटी भागात अचानक पाऊस पडतो.
आकृती ७. The International Research Institute for Climate and Society च्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
भारतीय उपखंडामध्ये हवामान मान्सून वार्यांवर अवलंबून असते. ऑस्ट्रेलियातील मान्सून आणि भारतीय मान्सून यांचा घनिष्ठ संबंध आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानावर एन्सोचा मोठा परिणाम होत असल्याने परिणामी भारतीय उपखंडाच्या हवामानावरही एन्सो घटनांचा परिणाम होतो. एल निन्यो घटनेनंतरच्या उन्हाळ्यामध्ये भारतीय उपखंडावर हवा अधिक प्रमाणात कोरडी होते व पावसाचे प्रमाण कमी होते, तर हिवाळ्यात थंडी कमी पडते. ला निन्यामुळे भारतामध्ये एकूण पावसात वाढ होते आणि हवामान थंड होते.
आकृती ८. The International Research Institute for Climate and Society च्या संकेतपानावरून साभार व सुधारित.
विषुववृत्तीय प्रशांत महासागर आणि किनारी प्रदेशांमध्ये एल निन्यो आणि ला निन्या परिस्थितींमुळे पाऊसपाण्यामध्ये कसा बदल होतो हे आपण वर पाहिलेच. तसेच किनारी प्रदेशांमधील मत्स्योत्पादन व संबंधित व्यवसायांवरील परिणामही पाहिले. पावसापाण्यावर शेती व्यवसाय अवलंबून असल्यामुळे अर्थातच शेती व इतर व्यवसाय यांवर परिणाम होऊन पर्यायाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हवामानबदल आणि मानवी आरोग्य यांचा परस्पर संबंध असल्याने एन्सोचा परिणाम तिथेही दिसतो. पावसापाण्यावर अनेक जीवजंतूंची वाढ आणि जननदर अवलंबून असतो. अनेक देशांतील साथीच्या रोगांचे प्रमाण एन्सो घटनांमुळे बदलल्याचे पुरावेही अनेक शोधनिबंधांमधून मिळतात. एन्सोच्या परिणामस्वरूप कोरड्या हवेमुळे काही ठिकाणी वणव्यांमध्ये वाढही होऊ शकते.
समुद्रपृष्ठाच्या तापमानावर चक्री वादळांची निर्मिती अवलंबून असते. गरम पाण्यामुळे वादळनिर्मितीस चालना मिळते. एन्सो घटना सर्व प्रमुख महासागरातील उष्णकटिबंधीय चक्री वादळांवर (tropical cyclones) परिणाम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी चक्री वादळांवरचा परिणाम वेगवेगळा असतो. चक्री वादळांवरचे परिणाम मुख्यत: पुढील प्रकारांचे असतात – १. चक्री वादळांच्या वारंवारितेमध्ये बदल (कमी वा जास्त संख्येने चक्री वादळांची निर्मिती), २. चक्री वादळांच्या मूळ स्थानांमध्ये बदल (सहसा महासागराच्या ज्या भागात वादळांची निर्मिती होते, त्या ऐवजी वेगळ्या भागांत वादळे निर्माण होतात), ३. चक्री वादळांच्या तीव्रतेमधील बदल. प्रशांत महासागरातील चक्री वादळांवर बदललेल्या सागर पृष्ठीय तापमानामुळे थेट परिणाम होतो. इतर महासागरांतील चक्रीवादळांवरचा परिणाम अभिसरण चक्रांमध्ये पडलेल्या फरकांच्या साखळी परिणामामुळे होतो.
एन्सो घटनांचे निरीक्षण, वेध व अंदाज
एन्सो घटनांचा सर्वाधिक परिणाम विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या आसपासच्या देशांच्या हवामानावर होत असल्याने ह्या देशांमधील हवामान संस्था सागरी पृष्ठाच्या तापमानाची सतत नोंद घेत असतात. ह्या नोंदींचा वापर करून हवामान अंदाज वर्तवण्यासाठी विविध हवामान प्रारुपे (climate models) चालवली जातात. प्रशांत महासागरी पृष्ठीय तापमानाची नोंद घेण्यासाठी विविध प्रकारच्या नांगरलेल्या वा तरंगत्या बुई (बुऑय), व कृत्रिम उपग्रहांचा (satellites) वापर होतो. एन्सोचे परिणाम जागतिक हवामानावर आणि पर्यायाने मानवी जीवनावर होत असल्यामुळे एन्सोचा अंदाज वर्तवणे महत्त्वाचे ठरते. प्रशांत महासागरी प्रदेशापासून दूर असणार्या देशांतील हवामान संस्थाही एल निन्योचा वेध घेऊ लागल्या आहेत. एल निन्योच्या अंदाजामुळे आगामी ऋतूंमधील बदल आणि त्यांचे अर्थकारण, आरोग्य आणि राहणीमानावर होणारे परिणाम यांची आगाऊ कल्पना येऊन त्यानुसार देशांच्या आर्थिक अंदाजपत्रकांमध्ये आणि वेळापत्रकांमध्ये बदल करता येऊ शकतात.
प्रशांत महासागराच्या मनस्वी स्वभावाचा जो जो वेध घ्यावा तो तो त्याचे नवनवे परिणाम आणि त्याची रुंदावणारी व्याप्ती जाणवू लागते. नवनव्या संशोधनांमधून आजवर न जाणवलेले परिणामही लक्षात येऊ लागले आहेत. तुम्ही जगात कुठेही राहा, प्रशांत महासागराच्या स्वभावाचा परिणाम कमी-जास्त प्रमाणात आणि लवकर किंवा उशीरा तुमच्यावर होतच असतो आणि होणारच असतो.
वरदा व. वैद्य, ऑक्टोबर २००९ | Varada V. Vaidya, October 2009
संदर्भसूची –
१. ‘Tropical Climatology: An Introduction to the Climates of the Low Latitudes’ by Simon Nieuwolt, Glenn R. McGregor, Publishers: Wiley, John & Sons, Incorporated, 1998, pp. 101 – 110.
२. NOAA चे एल निन्यो संकेतपान
३. The International Research Institute for Climate and Society (IRI) चे संकेतस्थळ
४. अर्बाना शॅंपेन येथील इलिनॉय विद्यापीठातील वातावरण विज्ञान विभागाचे WW2010 संकेतपान, El Nino: Online Guide