जाती पान्यानं भिजून धर्ती..
नोव्हेंबर 9, 2006 यावर आपले मत नोंदवा
ह्यापूर्वी – भाग १- या गो दरियाचा दरारा मोठा
भाग २- कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा
त्सुनामी – भाग ३
जाती पान्यानं भिजून धर्ती..
ऐतिहासिक त्सुनामी
आकृती ३: भूकंप-प्रवर्तित ऐतिहासिक त्सुनामींच्या उमगस्थानांचा नकाशा. त्सुनामी अलार्म सिस्टम येथून सुधारित.
आजपर्यंत अनेक त्सुनामी विविध किनार्यांना धडकल्या. काही त्सुनामींनी प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली तर काहींनी कमी प्रमाणात. काहींनी लोकांच्या मनांत घर केले, तर काही येऊन गेल्याचा कित्येकांना पत्ताही लागला नाही. काहींसाठी त्सुनामी येणे ही नित्याचीच गोष्ट झाली, तर काहींसाठी ती क्वचित घटना ठरली. काहींनी केवळ समुद्रामधून येणा-या त्सुनामी पहिल्या तर काहींना चक्क मोठ्या नद्यांमध्ये (उदाहरणार्थ चीनमधील पीत नदीमध्ये) आलेल्या त्सुनामींचेही दर्शन झाले. ह्यांपैकी काही ठळक त्सुनामींची माहिती पाहू. भूकंप-प्रवर्तित (earthquake-induced) त्सुनामींची संख्या प्रचंड असल्यामुळे (आकृती ३) त्या सगळ्यांबद्दल माहिती येथे देणे शक्य नाही. मात्र ज्या त्सुनामींमुळे हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले अशा काही त्सुनामींची माहिती तक्ता-१ मध्ये पाहा.
तक्ता-१: मृतांचा आकडा १००० वा त्याहून जास्त असणा-या भूकंपप्रवर्तित त्सुनामींच्या नोंदी. भूकंपाची तीव्रता रिश्टर मध्ये तर लाटांची उंची मीटरमध्ये आहे. संदर्भ – नॅशनल जिओफिजिकल डेटा सेंटर.
साल |
देश |
स्थान |
भूकंपाची |
लाटांची |
मृतांची संख्या |
१६९२ |
जमैका |
पोर्ट रॉयल |
७.७ |
२ |
२००० |
१८५४ |
जपान |
नानकिडो |
८.४ |
२८ |
३००० |
१८९६ |
जपान |
सानरिकु |
७.६ |
३९ |
२७१२२ |
१९०६ |
इक्वॅडोर |
किनारीभाग |
८.८ |
५ |
१००० |
१९२३ |
जपान |
टोकिडो |
७.९ |
१२ |
२१४४ |
१९३३ |
जपान |
सानरिकु |
८.४ |
३० |
३०६४ |
१९४६ |
डॉमिनिक रिपब्लिक |
ईशान्य किनारा |
८.१ |
५ |
१७९० |
१९६० |
चिली |
मध्य चिली |
९.५ |
२५ |
१२६० |
२००४ |
इंडोनेशिया |
सुमात्रा |
९.० |
३५ |
२९७२४८ |
तक्ता २: ज्वालामुखी-प्रवर्तित त्सुनामी. लाटांची उंची मीटरमध्ये आहे. “X” हे चिन्ह नोंदी उपलब्ध नसल्याचे दर्शविते. संदर्भ – नॅशनल जिओफिजिकल डेटा सेंटर
साल |
देश |
स्थान |
लाटांची |
मृतांची संख्या |
१८६८ |
यु. एस. ए. |
हवाई |
१४ |
४७ |
१८८३ |
इंडोनेशिया |
क्राकाटू |
३५ |
३६५०० |
१८८३ |
यु. एस. ए. |
कुक इनलेट |
९ |
X |
१९०२ |
सेंट विन्सेंट व |
सॉफ्रे ज्वालामुखी |
X |
१५६५ |
१९७५ |
यु. एस. ए. |
हवाई |
१४ |
२ |
२००३ |
मोन्सेरॅट |
सॉफ्रे हिल्स ज्वालामुखी |
४ |
X |
२००६ |
मोन्सेरॅट |
सॉफ्रे हिल्स ज्वालामुखी |
१ |
X |
त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा
त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणा-या यंत्रणेमधील (tsunami warning system) प्रमुख घटक – १. भूकंप निरीक्षण व संबंधित समुद्रपातळीवर निरीक्षण (आकृती ४), २. नव्या भूकंप हालचालींचा पूर्वीच्या त्सुनामींशी साम्य/संबंध तपासण्यासाठी पूर्वी येऊन गेलेल्या त्सुनामींचा डेटा, ३. निरीक्षण स्थानके (monitoring station), धोका-सूचना केंद्र (warning centers), जनतेला धोक्याची सूचना जाहीर करणारी रेडियो, टी.वी. इत्यादी स्थानके (broadcasting stations) यांदरम्यान संपर्क व समन्वय साधणारी यंत्रणा. संपर्क साधण्यासाठी कृत्रिम उपग्रहांची मदत घेण्यात येते.
आकृती ४. त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी नवी, सुधारित यंत्रणा. (सौजन्य नोआ)
आकृती ५.रोनाल्ड एच. ब्राउन ह्या संशोधन बोटीशी संलग्न, प्रशांत महासागरामध्ये तरंगणारी एक बुई (buoy). (सौजन्य – नोआ)
त्सुनामी निरीक्षण संस्था व धोक्याची सूचना देणारी केंद्रे
त्सुनामीच्या धोक्याची सूचना त्सुनामी किना-यावर येऊन थडकण्यापूर्वीच लोकांना मिळावी व जीवितहानी शक्यतो टळावी, कमितकमी व्हावी म्हणून अशी सूचना देणारी केंद्रे विविध ठिकाणी उभारण्यात आली आहेत. सागरतळाशी भूकंप झाल्यास त्सुनामी प्रारूप पळवणे, त्सुनामी निर्माण होण्याच्या शक्याशक्यतेचा अंदाज वर्तवणे, समुद्रातील त्सुनामींचा शोध घेणे (detect), कोणत्या किना-यावर लाटांची उंची किती असेल, किती नुकसान होऊ शकेल ह्याबाबत किनारी प्रदेशांना सावधगिरीचा इशारा देणे, किनारी प्रदेशातील लोकांनी स्थलांतरित (evacuate) होणे गरजेचे आहे का? असल्यास केवढ्या प्रदेशातील लोकांचे स्थलांतर केले जावे ह्यासारखे अंदाज वर्तवणे, ही आणि अशा प्रकारची कामे ह्या केंद्रांमध्ये केली जातात. काही केंद्रे आंतरराष्ट्रीय तर काही स्थानिक दर्जाची आहेत. त्सुनामीची आपत्ती ही इतर नैसर्गिक आपत्तींच्या (उदा. चक्रीवादळे, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, अवर्षण इ.) मानाने कमीवेळा येते. सर्व प्रमुख सागरांमध्ये हा त्सुनामीचा धोका कधी ना कधी अनुभवास येत असला तरी प्रशांत महासागरामध्ये एकूण त्सुनामींच्या सुमारे ८५% त्सुनामी निर्माण झालेल्या आढळतात. त्यामुळे प्रशांत महासागरामध्ये त्सुनामी निरीक्षण व धोक्याची सूचना देणा-या यंत्रणा व संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र इतर समुद्रांमध्ये अशा यंत्रणा एक तर विकसिनशील टप्प्यांमध्ये आहेत, अथवा नाहीतच. काही प्रमुख केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे –
आंतरराष्ट्रीय त्सुनामी माहिती केंद्र (इंटरनॅशनल त्सुनामी इन्फर्मेशन सेंटर ITIC)- होनलुलु, हवाई :- युनेस्को (UNESCO – United Nations Educational, Scientific and Cultural Organization) च्या आंतरशासकीय समुद्रशास्त्र संघटना (इंटरगवर्न्मेंटल ओशनोग्राफिक ऑर्गनायझेशन IOC) विभागाने १९६५ मध्ये ITIC ची स्थापना केली. त्सुनामीमुळे होणारी हानी कमीतकमी असावी म्हणून प्रशांत महासागरी प्रदेशातील देशांमधील विविध वैज्ञानिक संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, आरमार व संरक्षण संस्था आणि सामान्य जनता यांमध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित करणे हे ह्या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. ITIC च्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टमची अठ्ठावीस सदस्यराष्ट्रे आहेत- ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चिली, चीन, कोलंबिया, कुक आयलण्ड्स, कोस्टा रिका, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, इक्वॅडोर, एल् सॅल्वॅडोर, फिजी, फ्रान्स, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, निकराग्वा, पेरू, फिलिपिन्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, समोआ, सिंगापूर, थायलंड, रशियन फेडरेशन, यू.एस.ए. व विएतनाम.
प्रशांत महासागरी त्सुनामी धोका-सूचना केंद्र (पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर PTWC), इवा बीच, हवाई – नोआच्या राष्ट्रीय हवामान विभागाने (नॅशनल वेदर सर्विस) चालवलेले हे केंद्र हवाई, यु. एस. ए. च्या अखत्यारीतील तसेच इतर देशांच्या अखत्यारीत येणारी प्रशांत महासागरी बेटे व देशांना त्सुनामीच्या धोक्याची सूचना देण्याचे कार्य करते. हे केंद्र ITIC च्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टमचा एक भाग आहे.
पश्चिम किनारा व अलास्का त्सुनामी धोका-सूचना केंद्र (वेस्ट कोस्ट ऍण्ड अलास्का त्सुनामी वॉर्निंग सेंटर WCATWC), पामर, अलास्का – हे केंद्रही नोआ चालवते. कॅनडाचा किनारी भाग व हवाई व्यतिरिक्त यु. एस.ए. च्या किनारी प्रदेशाला त्सुनामीच्या धोक्याची सूचना देण्याचे कार्य हे केंद्र करते. हे तसेच प्युएर्तो रिको त्सुनामी धोका-सूचना व्यवस्था (प्युएर्तो रिको त्सुनामी वॉर्निंग ऍण्ड मिटिगेशन प्रोग्रॅम)- मायाग्वेझ, प्युएर्तो रिको हे केंद्रही ITIC शी जोडलेले आहे. ITIC च्या सदस्य राष्ट्रांमधील विविध संशोधन संस्था प्रादेशिक विभागांना त्सुनामीच्या धोक्याची सूचना देण्यासाठी तत्पर आहेत.
अगदी अलिकडच्या काळापर्यंत हिंदी महासागरी देशांमध्ये प्रशांत महासागरी क्षेत्राप्रमाणे त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा आणि संस्था अस्तित्वात नव्हती. डिसेंबर २००४ मध्ये इंडोनेशियाजवळ सागरतळाशी झालेल्या भूकंपामुळे जावा, सुमात्रा, आंदमान, श्रीलंका बेटे तसेच भारत व आजूबाजूच्या देशांमध्ये आत्यंतिक प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. तेव्हा जून २००५ मध्ये युनेस्कोच्या पुढाकाराने हिंदी महासागरी त्सुनामी धोका-सूचना केंद्राची (इंडियन ओशन त्सुनामी वॉर्निंग व मिटिगेशन सिस्टम IOTWS) स्थापना करण्यात आली. हिंदी महासागरी देशांतील विविध किनारी भागात त्सुनामीचा शोध घेणा-या व धोक्याची सूचना देणा-या यंत्रणा उभारल्या गेल्या/जात आहेत. भारत, श्रीलंका, इंडोनेशिया व मॉरिशस मधील शास्त्रज्ञांनी IOTWS च्या छताखाली एकत्रित काम करण्यास सुरुवात केली आहे. यु.एस.ए. ने ह्या मोहिमेस मोठ्या प्रमाणात तांत्रिक सहकार्य पुरवले आहे. भूमध्य सागरी प्रदेशांमध्येही अशी यंत्रणा येऊ घातली आहे. नोव्हेंबर २००५ मध्ये भूमध्य सागरी तसेच उत्तर अटलांटिक सागरी प्रदेशांमध्ये त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा उभारण्याची योजना आखली गेली आणि त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे.
डोंगराएवढ्या लाटांची निर्मिती करून मानवाने किनारी प्रदेशावर निर्माण केलेली सृष्टी एका क्षणात होत्याची नव्हती करणा-या दर्याचा मानवाला नेहमीच मोठा दरारा वाटत आला आहे. डोंगराएवढे नुकसान करणा-या त्सुनामींचा धोका वेळीच ओळखण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक तपे खपून उभारलेल्या यंत्रणेचा दरारा त्या दर्यालाही वाटत असेल का?
(समाप्त)
संदर्भ –
युनेस्कोचे त्सुनामी संकेतपान.
नोआचे त्सुनामी संकेतस्थळ.
नोआच्या त्सुनामी संशोधन केंद्राचे संकेतस्थळ.
आंतरराष्ट्रीय त्सुनामी माहिती केंद्र.
प्रशांत महासागरी त्सुनामी धोका-सूचना केंद्र.
पश्चिम किनारा व अलास्का त्सुनामी धोका-सूचना केंद्र.
यु.एस.ए. चा हिंदी महासागरी त्सुनामी धोका-सूचना केंद्रामधील सहभाग.
यु.एस. इन्फो.
<p><p><p>W4mMzM9KiYzNz1rb3M”>यु.एन. ऍटलास ऑफ ओशन.
वरदा व. वैद्य, ऑक्टोबर २००६ । Varada V. Vaidya, October 2006