पारिभाषिक संज्ञा – प्रस्तावना

परिभाषा आणि पारिभाषिक संज्ञा 

प्रत्येक विषयाची स्वत:ची अशी एक परिभाषा असते. त्या परिभाषेमध्ये विशिष्ट शब्दांचे विशिष्ट अर्थ असतात. हे अर्थ नेहमीच्या भाषेशी बरेचदा सुसंगतच असले तरी त्या विषयांच्या दृष्टीकोणातून एक नेमका अर्थ, एक नेमकी संज्ञा एखाद्या शब्दाला प्राप्त होते, तेव्हा ती परिभाषा होते. शास्त्रीय विषयांवर लेखन करताना परिभाषा वापरणे महत्त्वाचे आणि गरजेचेही असते. इथे लिहिलेल्या लेखांमध्ये अशा पारिभाषिक संज्ञा वारंवार वापरलेल्या आहेत, आणि भविष्यातही वापरल्या जातील.

काही संज्ञा ह्या प्रचलित आहेत, तर काही (प्रचलित नसल्यामुळे) तयार केल्या आहेत. मराठीतून विज्ञानाचा प्रसार होण्याकरता ह्या संज्ञा नक्कीच उपयोगी पडतील आणि वापरात येऊन रूढ होतील अशी आशा आहे. इथे वापरलेल्या एखाद्या संज्ञेसाठी एखादी प्रचलित संज्ञा असेल तर ती मला नक्की कळवा. तसेच मी तयार केलेल्या एखाद्या संज्ञेऐवजी दुसरा एखादा शब्द जास्त योग्य वाटत असेल, तर तसेही जरूर कळवा.

पारिभाषिक संज्ञा सूचीमध्ये संज्ञांचा क्रम अकारविले (अ ते ज्ञ असा बाराखडीतील स्वर आणि व्यंजनांच्या प्रचलित क्रमानुसार) आहे.

– वरदा वैद्य

Advertisements

माझ्या विषयी varada वरदा vaidya वैद्य
वरदा वैद्य हवामान आणि खगोल हे माझे आवडीचे विषय. ह्या विषयातील विविध घडामोडींबाबत लिहिण्यासाठी हा ब्लॉगप्रपंच. हवामानविषयक लेख वातकुक्कुटावर (www.vatkukkut.wordpress.com) तर खगोलाविषयी विवस्वान (www.khagras.wordpress.com) अनुदिनीवर वाचता येईल.

5 Responses to पारिभाषिक संज्ञा – प्रस्तावना

 1. techmilind says:

  वरदा,

  वेळ मिळाला तर शब्दभांडारावर ह्या संज्ञा चढवशील का प्लीज ?

  – मिलिंद

 2. Shuddha Marathi says:

  पारिभाषिक संज्ञांविषयी:–काही संज्ञांविषयी पुनर्विचार शक्य आहे. उदाहरणार्थ,
  Meteor म्हणजे आकाशातून पडू शकणारे काहीही. ढग, वीज, पाऊस, हिम, धुके, दंव, उल्का ऊर्फ अशनी इत्यादी. अशनी शब्दाला हा विशिष्ट अर्थ द्यायला हरकत नाही, अन्यथा आकाशात्पतित शब्द चांगला आहे.(अलुक्‌‌‍ समास). बरा वाटत नसेल तर नभपतित.
  Latitude हे वर्तुळ असेल तर अक्षवृत्त, माप असेल तर अक्षांश असे स्पष्टीकरण हवे.
  Trough म्हणजे दरी की खळगा? दरी शब्द Depression ला जास्त शोभून दिसेल.
  Hygrometer-दाबमापक? काहीतरी चुकते आहे. आर्दतामापक! Hydrometer म्हणजे तरकाटा .
  धननिर्झर-Travelling spark?
  Pilot leader–अग्रस्थ किंवा पथदर्शी. चालेल?
  Magnitude-भूकंप तीव्रता की भव्यता/भीषणता -विशालता? Intemsity म्हणजे तीव्रता. भूकंपामध्ये किती शक्ती मोकळी झाली याचे माप म्हणजे Magnitude; ही रिच्टर स्स्केलमध्ये मोजतात. Intensity –नुकसानीच्या संदर्भात वापरायचा एक अंक.
  Nearfield/farfield–Local/Remote?
  Local/Remote–स्थानिक/दूरस्थित-धृत चालू शकेल.
  शाखाविद्युतपात पेक्षा दाते(री) विद्युत्पात.
  ‘वाराजन्य’प्रमाणे मराठी-संस्कृत समास.
  स्थैतिक विद्युत? प्रचलित शब्द–स्थिर किंवा अचल.
  विद्युतधारा की प्रवाह?—शुद्धमती राठी.२८-३-२००७-२१००UTC

 3. varadavaidya says:

  शुद्धमती राठी,
  नमस्कार. वातकुक्कुटावरील आपल्या प्रतिसादाबद्दल अनेकानेक धन्यवाद. आपल्या काही सुचवण्या पटल्या काही पटल्या नाहीत. आर्द्रतामापक आणि धननिर्झराच्या बाबतीतली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, वेळ मिळताच ते बदल वातकुक्कुटावर करेन. latitude साठी अक्षवृत्त आणि अक्षांश असे दोन्ही उल्लेख करण्याची सूचनाही पटली.
  meteor हा शब्द खगोलशास्त्रामध्ये उल्का/अशनी ह्या दोन्ही अर्थाने वापरला जातो. मी जिथे हा शब्द वापरला आहे तिथे खगोलशास्त्राचाच संदर्भ आहे. मराठीमध्ये उल्का आणि अशनी हे दोन शब्द थोडा वेगवेगळा अर्थ दाखवतात. इंग्रजीमध्ये उल्का आणि अशनीमधील फरक दाखवणारे दोन वेगळे शब्द नाहीत. meteor चा अर्थ आकाशपतित असा असला तरी तो अर्थ अशनी ह्या शब्दाला द्यावा असे वाटत नाही. तसेच वीजेचा समावेश meteor मध्ये होण्याबाबतीत मी साशंक आहे.
  Trough साठी दरी हा प्रमाणित पारिभाषिक शब्द आहे. मराठी माध्यमाच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये दरी आणि शिखर असे शब्द सापडतील, खळगा सापडणार नाही. तीच गोष्ट स्थैतिक विद्युत ह्या शब्दाबाबतही आहे. static electricity साठी स्थैतिक विद्युत हा प्रमाणित पारिभाषिक शब्द आहे. भौतिकशास्त्राच्या पुस्तकात स्थैतिक विद्युत आणि धारा विद्युत असे उल्लेख सापडतील. विद्युतधारा हा शब्दही प्रचलित व प्रमाणित असून भौतिकशास्त्राच्या पुस्तकात सापडेल.
  magnitude हा शब्द तीव्रता ह्या अर्थानेही वापरला जातो. भूकंप तीव्रता हा शब्द योग्य आहे. त्या ऐवजी भव्यता/भीषणता हे पटले नाही.
  Remote साठी दूरस्थ काय वाईट आहे? दूरस्थित-धृत मध्ये धृत म्हणजे काय? दूरस्थ आणि दूरस्थित मध्ये मला विशेष फरक जाणवत नाही.
  शाखाविद्युतपेक्षा दाते वा दातेरी विद्युतपात हा शब्द पटला नाही. दाते हे सामान्यत: त्रिकोणी आकाराचे असून ह्या त्रिकोणाचा पाया आणि उंची सामान्यत: सारख्याच लांबीचे असतात. तसेच दात्यांचा आकार हा मूळ वस्तूच्या आकाराच्या तुलनेत खूपच लहान असतो. शाखा म्हणजे फाटे. फाटे हे विविध आकाराचे आणि विविध लांबीचे असू शकतात. त्यामुळे शाखाविद्युतपात हाच शब्द योग्य वाटतो.
  सुचवण्यांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या लेखनात काही चुका आढळल्यास भविष्यातही नजरेस आणून द्याव्या ही विनंती.
  -वरदा वैद्य.

 4. Shuddha Marathi says:

  हवामानशास्त्रामध्ये(Meteorology) Lithometors, hydrometeors आणि electrometeors हे शब्द आहेत. त्यातील electrometeors म्हणजे आकाशातून पडणारी वीज. भूकंपशास्त्रात Intensity आणि Magnitudeयाचे अर्थ भिन्‍न आहेत. त्यामुळे मी वेगळा शब्द सुचवण्याचा प्रयत्‍न केला होता. दातेरीविद्युत मी चुकून लिहिले होते, माझ्या मनात फाटेरी विद्युत हा (नवीन) शब्द होता. शाखाविद्युतपेक्षा हा शब्द जास्त अर्थवाही आहे. Trough(of low pressure)च्या विरुद्ध ridge. अशा अर्थाने ट्रफला खळगा व रिजला उंचवटा. नकाशावर काढलेल्या समभार किंवा तत्सम रेषांच्या बाबतीत हेच शब्द योग्य वाटतात. (कमी दाबाची)दरी शब्द आत्यंतिक कमी दाबासाठी(उदा. Depression) वापरणे उचित ठरेल. आजकाल भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या डॉ रघुवीरांच्या हिंदी शब्दकोशातील बोजड शब्द मराठीत घ्यायला लागल्यापासून भौतिक व रसायनशास्त्रांचा अभ्यास फार क्लिष्ट झाला आहे. आमच्या लहानपणी चल-अचल वीज हेच शब्द पुस्तकातून वापरले होते. दूरस्थित/धृत हा शब्द handheld remoteसाठी मी सुचवला होत. अर्थात दूरस्थ/दूरधृत पण चालेल. विजेचा प्रवाह ह्या रोज घरी वापरला जाणार्‍या शब्दाऐवजी विद्युतधारा का वापरावा?
  माझी मते आपल्याला पटतीलच असे नाही पण विचार करण्यासारखी नक्की असावीत.–SM

 5. Shuddha Marathi says:

  photometeorsमध्ये इंद्रधनुष्य, धृवीय प्रकाश आणि बहुतेक मृगजळाचा समावेश होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: