प्राचीन काळातील वाराविचार

ह्यापूर्वी – भाग १- प्रस्तावना‎

वातावरणातील अभिसरण
भाग २ – प्राचीन काळातील वाराविचार

प्राचीनकाळी वारा वाहणे, वादळ होणे, विजा चमकणे, पाऊस पडणे अशा नैसर्गिक घटनांकडे ‘दैवी चमत्कार’ म्हणून पाहिले जाई. निसर्गातील विविध गोष्टींचे नियमन करण्यासाठी परमेश्वराने विविध देवता योजलेल्या आहेत अशी कल्पना होती. ह्या विविध देवता ह्या सर्व घटनांद्वारे माणसांशी संपर्क साधतात असा समज होता. ह्या देवता संतुष्ट आहेत तोपर्यंत योग्य प्रमाणात पाऊस पडेल, योग्य प्रमाणात आणि योग्य दिशेने वारे वाहतील, मात्र ह्या देवतांचा कोप झाल्यास वादळ होईल, पूर येतील, अवर्षण होईल असाही समज होता. त्यामुळे ह्या देवतांना संतुष्ट ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाई. ह्या नैसर्गिक घटनांमागील कारणे व त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध माहीत नसल्याने ह्या देवतांना विशेष महत्त्व होते. विविध दिशांनी वाहणा-या वा-यांसंबंधात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा अलीकडील काळापर्यंत प्रचलित होत्या. काही विशिष्ट दिशांनी वाहणारे वारे हे वाईट हवामान घेऊन येतात आणि ह्या वाईट हवामानामुळे प्रकृतीअस्वास्थ्य निर्माण होते असे गैरसमज होते.

प्राचीन रोमन आणि ग्रीक वाङ्मयात हवामानशास्त्र आणि वा-यांसंबंधी लिखाण आढळते. ‘होमेरिक’ आणि ‘हेसॉडिक’ महाकाव्यांमध्ये काही हवामानीय घडामोडींचा उल्लेख आढळतो. ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात ‘होमर’ने रचलेल्या ‘इलियाड’ आणि ‘ओडिसी’ ह्या काव्यग्रंथांमध्येही हवामानीय घडामोडींचा उल्लेख आढळतो. ह्या महाकाव्यांमध्ये हवामानीय घडामोडींना ‘देवाची करणी’ मानलेले आहे. ‘झ्यूस’ (Z

eus) देवाला ‘ढग जमविणारा’ मानलेले असून झ्यूसची मुलगी ‘अथीन’ (Athene) ही वा-यांची नियामक; तर टार्टारस (Tartarus) आणि गाया (Gaia-पृथ्वी) चा मुलगा ‘टायपोयस’ (Typoeus) हा वा-याचा निर्माता मानलेला आहे.

ग्रीक चार प्रकारचे वारे आणि संबंधित चार देवता मानत असत. ग्रीक देव ‘ओलस’  (Aeolus) हा ‘वा-यांचा देव’ मानला जाई. काही ग्रीक पौराणिक कथांनुसार ‘ऍस्ट्रस’ (Astraeus) हा चार वा-यांचा देव आणि चार वारे म्हणजे त्याची चार मुले – ‘बोरिआज’ (Boreas), ‘झेफिरस’ (zephyrus), ‘युरस’  (Eurus)  आणि ‘नोटस’ (Notus) – असे मानत. ‘बोरिआज’ हा ग्रीसच्या ‘थ्रेस’ ह्या सुपीक प्रांतामध्ये राहणारा ‘उत्तरवारा’; वादळी आणि विनाशक वृत्तीचा मानला जाई. रोमन ह्या उत्तरवा-यास ‘अक्विलो’ म्हणून ओळखत. ‘युरस’ हा जोरकस ‘पूर्ववारा’ पूर्वेहून ऊब आणि पाऊस घेऊन येतो असे मानले जाई. ‘नोटस’ हा ‘दक्षिण आणि अग्नेय वारा’ हा उबदार आणि दमट असून धुके आणि पाऊस आणणारा मानला जाई.  हा वारा धुके पसरवत असल्याने डोंगरमाथ्यावर गुरे चारणा-या गुराख्यांचा आणि दर्यावर्दींचा शत्रू तर चोर-दरवडेखोरांचा मित्र मानला जाई. ‘झेफिरस’ हा ‘पश्चिमवारा’ ‘थ्रेस’मधील एका गुहेत रहातो असे मानत असत.

प्राचीन काळापासून मानवास हवामान अंदाज, विशेषतः पर्जन्यमान अंदाज वर्तविण्याची गरज भासली आहे. शेती-उत्पन्न हे पर्जन्यमानावर अवलंबून असल्याने पर्जन्यमानाचा अंदाज पेरणी करण्यापूर्वीच माहित होणे महत्त्वाचे ठरते. प्राचीनकाळी ढगांशी-ढगांच्या राशी व प्रकार यांच्याशी – पर्जन्याचा संबंध असतो हे मानवाच्या लक्षात आले असले तरी वातावरणीय अभिसरणाचे ढग व पर्जन्यासंबंधातील महत्त्व मात्र तेवढे लक्षात आले नव्हते.

हवामानाचा अभ्यास करण्याची भारतीय परंपरा प्राचीन कालापासूनची आहे. वेदांमध्ये विविध नैसर्गिक गोष्टी/स्थितींना देवतास्वरूप देऊन त्यांना आवाहन करणारी सूक्ते लिहिली आहेत. उषा, निशा, दिशा, मरुत्, वरूण वगैरे नैसर्गिक गोष्टींवर मानवी आरोपण करून त्यांची स्तुती करणारी, त्यांचे वर्णन करणारी, त्यांना आवाहन करणारी सूक्ते ही सर्व मानवी व्यवहार नैसर्गिक संकटांशिवाय सुरळीत चालावे ह्यासाठी देवतांची प्रार्थना करतात.

इ‌. स. पूर्व ३००० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या उपनिषदांमध्ये मेघनिर्मिती, पर्जन्य, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे निर्माण होणारे ऋतुचक्र ह्यांचे विवेचन आढळते. इ. स. ५०० मध्ये लिहिल्या गेलेल्या बृहत्संहितेमध्ये सूर्याचे पर्जन्यविषयक (आदित्यात् जायते वृष्टि) महत्त्व आणि पर्जन्य-शेत्योत्पादन संबंध यांची चिकित्सा केलेली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रामध्ये पर्जन्यमानाचे मापन व त्यांची नोंद ठेवण्याची आवश्यकता आणि महत्त्व नोंदलेले आहे. तसेच ह्या ग्रंथामध्ये पर्जन्यमान-शेती उत्पन्न-शेतसारा-अर्थशास्त्र ह्यांची परस्पर सांगड घातलेली आहे. सुमारे सातव्या शतकामध्ये महाकवि कालिदासाने लिहिलेल्या मेघदूतामधील ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ मध्य भारतावरील आकाशात गोळा होणा-या, मौसमी पावसाची वर्दी देणा-या मेघांची आणि ह्या मेघांच्या मार्गक्रमणाची वर्णने सर्वश्रुत आहेत.

पराशर ऋषींनी लिहिलेल्या ‘कृषि-पराशर’ ह्या ग्रंथामधे कृषितंत्राबरोबरच ढग, ढगांचे प्रकार व विविध प्रकारच्या ढगांचा आणि पर्जन्यराशीचा परस्परसंबंध ह्यांचेही सविस्तर विवेचन आहे. मात्र वातावरणीय अभिसरणाची वा वा-याची भूमिका केवळ ‘बाष्प वाहून नेणारा’ एवढीच मानली गेली आहे. तत्कालीन ऋषींचा ग्रहस्थिती व पर्जन्यमान ह्याचाही अभ्यास होता. ग्रहस्थितीचा व पर्जन्यमानाचा प्रत्यक्ष संबंध असणे अशक्य असले तरी अनेक वर्षांच्या अनुभवावरून आणि अवलोकनावरून लक्षात आलेला असा सांख्यिकीय संबंध (statistical corelation) विचारात घेऊन दरवर्षी हवामान अंदाज करणे हे ज्योतिषांचे एक काम असे. मात्र ह्या सांख्यिकीय अभ्यासात हवामानकारक असलेले वातावरणीय अभिसरण लक्षात घेतल्याचे आढळत नाही.

प्राचीन काळातील पंडितांनी मिळवलेल्या ज्ञानाचा अभ्यास करून आणि त्यात भर टाकून मानवी पिढ्या आपले निसर्गाबद्दलचे कुतूहल अधिक ज्ञान मिळवून शमविण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्या प्रयत्नांमध्ये मध्ययुगामध्ये पडलेली भर पुढच्या लेखात पाहू.

वरदा व. वैद्य, ऑगस्ट २००५ । Varada V. Vaidya, August 2005

ह्यानंतर – भाग ३- मध्ययुगीन अभिसरणविचार

Advertisements

माझ्या विषयी varada वरदा vaidya वैद्य
वरदा वैद्य हवामान आणि खगोल हे माझे आवडीचे विषय. ह्या विषयातील विविध घडामोडींबाबत लिहिण्यासाठी हा ब्लॉगप्रपंच. हवामानविषयक लेख वातकुक्कुटावर (www.vatkukkut.wordpress.com) तर खगोलाविषयी विवस्वान (www.khagras.wordpress.com) अनुदिनीवर वाचता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: